दशपर्णी अर्क, बीजप्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
| तळा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने ‘खरीप हंगाम मोहीम 2026′ अंतर्गत पढवण येथे स्थानिक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पारंपरिक अन् आधुनिक सेंद्रिय शेती पद्धतीची सविस्तर माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने दशपर्णी अर्क तयार करणे, भात बीजप्रक्रिया, भात उगवणशक्ती तपासणे आणि गोकृपा अमृत निर्मिती या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी हनुमंत कांबळे उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना बदलत्या हवामानात कमी खर्चात शाश्वत उत्पन्न कसे घ्यावे, याविषयी मोलाचा सल्ला दिला. तसेच मंडळ कृषी अधिकारी घालमे यांनी खरीप हंगामातील नियोजनाचे महत्त्व पटवून दिले. सहाय्यक कृषी अधिकारी योगेश कोळी यांनी प्रत्यक्ष कृतीतून विविध प्रात्यक्षिके करून दाखवली, ज्यामुळे उपस्थितांच्या शंकांचे जागेवरच निरसन झाले.
कार्यक्रमादरम्यान खालील प्रमुख बाबींचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले दशपर्णी अर्क निर्मिती: रासायनिक कीटकनाशकांना फाटा देत, स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या विविध 10 प्रकारच्या वनस्पतींच्या पानांपासून नैसर्गिक कीटकनाशक (दशपर्णी अर्क) कसे तयार करावे, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
भात पिकाला सुरुवातीच्या काळात रोगांपासून वाचवण्यासाठी बीजप्रक्रिया कशी करावी आणि पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती कशी तपासावी, याबद्दल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवण्यात आले. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या गोकृपा अमृताबद्दल माहिती देऊन त्याची निर्मिती कशी करावी, हे सांगण्यात आले.याप्रसंगी पढवण ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृषी विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे आगामी खरीप हंगामात पढवण गावातील भात पिकाची उत्पादकता वाढण्यास आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.







