माजी आमदार बाळाराम पाटील यांची उपस्थिती
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेविका मनिषा अनंता म्हात्रे यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नगरसेविका मनिषा म्हात्रे यांचे पती तसेच शेतकरी कामगार पक्षाचे धाकटा खांदा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते अनंता म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनंता म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
या उद्घाटन सोहळ्यास विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, गटनेते केतन भगत, शेकापचे पनवेल विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष काशिनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, तालुका चिटणीस राजेश केणी, नगरसेवक लतिफ शेख, मुकुंद म्हात्रे, भरत म्हात्रे, अनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र पाटील, नगरसेविका आर्या जाधव, अर्चना भोईर, योगिता फडके, नंदकिशोर भोईर, शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख प्रविण जाधव, शेकापचे शहर चिटणीस दिलीप कदम, महिला आघाडीच्या माधुरी गोसावी, अनिल ढवळे, दत्तात्रय कडू, लोकेश पाटील, भालचंद्र राजभर, उमेश डोंगरे, रोशन पाटील, नरेश म्हात्रे, संतोष पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी नगरसेविका मनिषा म्हात्रे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पनवेलमधील विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधले. सत्ताधारी पक्षाकडून जनतेच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप बाळाराम पाटील यांनी केला. महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, विरोधी पक्षनेते आणि पदाधिकारी नागरिकांच्या समस्यांसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. पनवेलकरांच्या हितासाठी आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी नगरसेविका मनिषा म्हात्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. धाकटा खांदा येथील नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच पनवेल शहर आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.







