क्रिकेट जगताला टी-20 लीगचा विळखा!; आयसीसीचीविशेष समिती स्थापन
| मुंबई | प्रतिनिधी |
क्रिकेट जगतात फ्रँचायझी टी-20 लीगमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं भवितव्य धोक्यात आले आहे. दिवसांगणिक जगभरातील वेगवेगळ्या देशात खेळवण्यात येणाऱ्या टी-20 लीग स्पर्धेची संख्या वाढत असून अनेक स्टार क्रिकेटर राष्ट्रीय ड्युटीपेक्षा फ्रँचायझी लीगच्या ब्युटीला भुलत आहेत. या आकर्षणाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फटका बसू नये, यासाठी आता आयसीसीने मोठे पाऊल उचलत एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती फ्रँचायझी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांच्यात समतोल कसा राखता येईल? याचा अभ्यास करणार आहे.
जगभर झपाट्याने वाढणाऱ्या 20 फ्रँचायझी लीग्सच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने विशेष समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली. या समितीचे मुख्य काम फ्रँचायझी लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक यांच्यात समतोल राखण्यासाठी आराखडा तयार करणे हा असेल. सध्याच्या क्रिकेट संरचनेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, याची खात्री देखील ही समिती करेल.
आयसीसीच्या मते, सदस्य देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये अशी चिंता वाढत आहे की, देशांतर्गत टी 20 लीग्सच्या विस्तारामुळे द्विपक्षीय मालिका आणि आयसीसीच्या फ्यूचर टूर प्रोग्रामवर सतत दबाव वाढत आहे. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फ्रँचायझी क्रिकेटच्या झपाट्याने वाढणाऱ्या विस्ताराबाबत बोर्डाने चिंता व्यक्त केली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडर आणि फ्रँचायझी क्रिकेट यांच्यातील सुसंगतीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीसी बराच काळ खेळाडूंची उपलब्धता, राष्ट्रीय संघांप्रती असलेली बांधिलकी आणि फ्रँचायझी क्रिकेटच्या व्यावसायिक यशामधील संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही आयसीसीच्या विविध समित्यांमध्ये अशी सूचना मांडण्यात आली होती की, एका खेळाडूला एका हंगामात मर्यादित संख्येनेच फ्रँचायझी लीग्स खेळण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच सर्वोच्च प्राधान्य राहील. विशेषतः लहान क्रिकेट राष्ट्रांसाठी ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे. कारण तेथील अनेक खेळाडू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा फ्रँचायझी क्रिकेटला अधिक फायदेशीर आणि स्थिर करिअरचा पर्याय मानू लागले आहेत.
अलीकडच्या काळात अनेक मोठ्या खेळाडूंनी फ्रँचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यामध्ये निकोलस पूरन आणि हेन्रिक क्लासेन यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. पूरनने वयाच्या 30 वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्याचप्रमाणे सुनील नरेननेही बऱ्याच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे बंद केले होते, मात्र तो अजूनही विविध फ्रँचायझी लीग्समध्ये सक्रिय आहे.
फ्रँचायझी लीगचा धमाका
गेल्या काही वर्षांत फ्रँचायझी क्रिकेटचा विस्तार प्रचंड वेगाने झाला आहे. इंडियन प्रीमियर लीग व्यतिरिक्त एसए20, इंटरनॅशनल लीग टी 20, बिग बॅश लीग, बांगलादेश प्रीमियर लीग, लंका प्रीमियर लीग, द हंड्रेड आणि कॅरेबियन प्रीमियर लीग यांसारख्या स्पर्धांनी क्रिकेट कॅलेंडरमध्ये मोठी जागा व्यापली आहे. याशिवाय यंदापासून युरोपियन टी 20 प्रीमियर लीगचीही सुरुवात होत असून त्यामुळे क्रिकेटचे वेळापत्रक आणखी व्यस्त होणार आहे.







