सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा
| रायगड| जिल्हा प्रतिनिधी|
शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांचा वाढदिवस गुरुवारी (दि.4) अलिबाग तालुक्यातील वरसोलीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वरसोली येथील खंडोबा मंदिराच्या सभागृहात रक्तदान आणि मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराला रक्तदात्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्याने, लायन्स क्लब अलिबाग व रक्तबंध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लायन्स हेल्थ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने रक्तदान व नेत्रतपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चिकित्सा शिबीर हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख तथा लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, माजी नगरसेवक संजना कीर, मच्छिमार सोसायटीचे चेअरमन धर्मा घारबट, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष भोबू, अविनाश राऊळ, महेश कवळे, संजू माळी, विकास घरत, संदीप जगे, डॉ. गोसावी, डॉ. शुभदा कुडतडकर, रक्तबंध संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, सीएफटीआयचे कर्मचारी आदी मान्यवरांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, शेकाप कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश घरत यांचा वाढदिवस खंडोबा मंदिराच्या सभागृहात करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सकाळपासून सुरु झालेल्या शिबीराला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 180 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले. यावेळी अनेकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रुग्णांना मोफत चष्मेदेखील वाटप करण्यात आले. वयोवृध्दांसह तरुण मंडळींनी या शिबीराचा लाभ घेतला.
सुरेश घरत म्हणजे जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे नेतृत्वः चित्रलेखा पाटील
सुरेश घरत सारखे कर्तृत्ववान कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षात असणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिले असून ते खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांनी सुरेश घरत यांच्यावर तालुका चिटणीस म्हणून जबाबदारी दिली. ती जबाबदारी समर्थपणे आणि सक्षमपणे सांभाळत आहेत. सर्वसामान्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडविण्यामध्ये त्यांचा एक वेगळा हातखंडा आहे. भविष्यात त्यांचे व्यक्तीमत्व व्यापक स्वरुपात असल्याचे पहावायस मिळणार आहे. शेकापसह पाटील कुटूंबियांचा पाठींबा आणि सहकार्य कायम असेल, असा विश्वास शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
सुरेश घरत यांचे कार्य उल्लेखनीयः ॲड. मानसी म्हात्रे
शेतकरी कामगार पक्षाने तालुका चिटणीस म्हणून सुरेश घरत यांच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर तालुक्यातील पक्षाला व आणि कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे काम त्यांनी खऱ्या अर्थाने केले आहे. स्मार्ट मीटर व रस्ते आणि बेकारी याविषयांवर त्यांनी अनेक आंदोलने केली आहे. त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. विधायक कामांसाठी सुरेश घरत यांच्यासारखे नेतृत्व पक्षाच्या बळकटीसाठी महत्वाचे आहे,असे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड.मानसी म्हात्रे यांनी केले.









