| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये येण्यासाठी असलेला नेरळ-माथेरान घाट रस्ता बांधकाम खात्याने अद्याप स्वच्छ केलेला नाही. त्यामुळे आजही या रस्त्याच्या बाजूची गटारे दगड मातीने भरलेली आहेत. मागील वर्षीचा पावसाळा संपून आठ महिने झाले, तरी बांधकाम विभागाला उद्याप जाग आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात ही गटारे पाण्याने भरून ओव्हर फ्लो होतील, अशी भीती स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
कर्जत तालुक्यातील माथेरान या पर्याटन स्थळाला जोडण्यासाठी एकमेव नेरळ-माथेरान हा घाट रस्ता आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या घाट रस्त्यात काही ठिकाणी डाव्या तर काही ठिकाणी उजव्या बाजूला पाणी जाण्यासाठी गटार बांधले आहेत. मात्र, या गटारांच्या साफसफाईचे काम अद्याप झालेले नाही. माथेरान घाट रस्तात ज्या ठिकाणी खड्डे होते किंवा धोक्याची वळणे होती अशा ठिकाणी डांबरीकरण करून ते खड्डे बुजविण्यात आले आहेत. परंतु, त्याच घाट रस्त्यामध्ये असणारी गटारे मात्र बांधकाम विभागाला साफ करता आली नाही. सध्या पावसाला रिमझिम सुरूवात झाली असून, येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. जर या गटाराची स्वच्छता केली नाही, तर गटारातील पाणी ओव्हर फ्लो होऊन ते रस्त्यावरून वाहेल. परिणामी नुकतेच केलेले रस्त्याचे डांबरीकरण पुन्हा उखडून जाईल. त्यामुळे बांधकाम खात्याच्या या कारभाराबद्दल टॅक्सी चालकांसह स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत.







