| कळंबोली | प्रतिनिधी |
राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयाला अनेक ठिकाणी नागरिकांकडून विरोध होत असतानाच महावितरणकडून कळंबोली येथील ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत पूर्वसूचना देणारे संदेश पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
महावितरणकडून ग्राहकांच्या मोबाईलवर पाठविण्यात आलेल्या संदेशानुसार, भारत सरकारने 17 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार ज्या ग्राहकांकडे अद्याप स्मार्ट मीटर बसविण्यात आलेले नाहीत, त्यांचे विद्यमान वीजमीटर 48 तासांनंतर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. हा संदेश मीटर बदलण्याबाबतची पूर्वसूचना असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
संदेशात स्मार्ट मीटरचे विविध फायदेही नमूद करण्यात आले आहेत. यामध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक बिलिंग, मोबाईल ॲपद्वारे वीज वापर आणि बिलावर नियंत्रण, सौरऊर्जेच्या उपलब्ध वेळेत घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 85 पैशांची सवलत तसेच मीटर बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, अनेक ठिकाणी नागरिक, सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी स्मार्ट मीटर प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजदर वाढण्याची भीती, प्रीपेड प्रणाली लागू होण्याची शक्यता आणि ग्राहकांवरील आर्थिक भार वाढेल, अशा कारणांमुळे विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत महावितरणकडून थेट ग्राहकांना संदेश पाठवून मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांनी या संदेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.






