सुदैवाने जिवीतहानी टळली, मात्र एसटी बसचे नुकसान
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
लोणावळ्याकडून अलिबागकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. ही घटना गुरुवारी (दि.25) सकाळी सागाव जवळील मोरीजवळ घडली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगला धडकून गाडी चिखलात रुतली. सुदैवाने जिवीतहानी टळली. परंतु, एसटी बसचे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पेण आगाराची ही एसटी बस सकाळी साडेपाच वाजता लोणावळ्याकडे रवाना झाली होती. त्यानंतर सकाळी सव्वा सातच्या सुमारास लोणावळ्यातून अलिबागच्या दिशेने निघाली. पेणमार्गे अलिबागकडे येत असताना सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास सागाव बस स्थानकाच्या पुढे मोरीजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगला धडक देऊन बस चिखलात रुतली. अचानक बसचा अपघात झाल्याने प्रवासी वर्गात भिती निर्माण झाली. या बसमध्ये 52 प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, एसटी अपघाताच्या घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.







