सुदैवाने जीवितहानी टळली; ग्रामस्थांमध्ये संताप
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे पुनिर गावातील ग्रामस्थांच्या सार्वजनिक वापरातील विहीर शनिवारी (दि.27) पहाटे अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक वर्षांपासून गावाच्या पाणीपुरवठ्याचा आधार असलेली ही विहीर पूर्णपणे खचल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून विहिरीच्या आतील दगडी बांधकामातून दगड निखळत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. विहीर धोकादायक अवस्थेत असल्याची कल्पना असूनही वेळेत दुरुस्ती किंवा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. अखेर शनिवारी पहाटे विहिरीचा काठ आणि आतील दगडी बांधकाम एकाचवेळी कोसळल्याने संपूर्ण विहीर निकामी झाली.
घटना पहाटे घडल्याने त्या वेळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी कोणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडली असती तर जीवितहानीची शक्यता नाकारता आली नसती, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीच्या परिसरात नागरिक, लहान मुले किंवा जनावरे पडून अपघात होऊ नये, यासाठी विहिरीभोवती तारेचे संरक्षक कुंपण उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
मात्र, केवळ कुंपण उभारून प्रश्न सुटणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. ही विहीर गावातील अनेक कुटुंबांच्या दैनंदिन पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत होती. त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता पर्यायी पाणीपुरवठ्याची त्वरित व्यवस्था करावी तसेच नवीन सार्वजनिक विहीर उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासोबतच विहीर कोसळण्यामागील नेमकी कारणे शोधण्यासाठी संबंधित विभागाने सखोल चौकशी करावी, तसेच तालुक्यातील इतर जुन्या सार्वजनिक विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व सुरक्षेच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पुनिर गावातील पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर किती तत्परतेने कायमस्वरूपी तोडगा काढते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.







