| चिरनेर | प्रतिनिधी |
युसुफ मेहरअली सेंटर (एनजीओ)च्या रायगड प्रकल्पाच्या संचालकपदी सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी सेवा पुरस्काराचे मानकरी मधुकर पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनिमित्त उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मधुकर पाटील हे आदिवासी, शेतकरी आणि कष्टकरी यांच्या विविध प्रश्नांवर अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. कष्टकरी मुक्ती संघटना (रायगड), विशेष आर्थिक क्षेत्र विरोधी संघटना तसेच बेरोजगार युवा संघटना यांच्या माध्यमातून त्यांनी डॉ. जी.जी. पारीख आणि डॉ. शांती पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल, उरण, पेण, खालापूर आणि कर्जत तालुक्यांत सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय योगदान दिले आहे.
रायगड प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आयोजित सत्कार समारंभाला युसुफ मेहरअली सेंटरचे उपाध्यक्ष नितीन आणेराव, विश्वस्त गुरव, गुड्डीजी, उल्का धुरी, अकाऊंटंट समीर, उरणचे माजी सभापती विश्वास म्हात्रे, भार्गव, सुनील जोशी, सुरेखा पाटील, लक्ष्मण वाघे, किसन माळभोम, नामदेव ठाकूर, दीपक, विकीभाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मधुकर पाटील यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत, त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सामाजिक विकासाच्या उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.







