| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्रासह अवघ्या देशाला हादरवून सोडलेल्या नसरापूर बालिका बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील 65 वर्षीय भीमराव कांबळे या नराधमामला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणाचा सोमवारी (दि.29) न्यायालयाने निकाल देताना, भीमराव कांबळेच्या कृत्याचा पाढा वाचताना, “आता फासावर चढा” अशा शब्दांत ठणकावले आहे. गेल्या काही दिवसांपासून या निकालाची चर्चा अवघ्या देशभरामध्ये झाली होती. पुणे पोलिसांनी अवघ्या 16व्या दिवशी आरोपपत्र दाखल केले. अवघ्या दोन महिन्यांमध्ये या प्रकरणाचा निकाल लावण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने पुणे पोलिसांनी तपास केला आणि पुरावे सादर केले, त्या संदर्भात पोलिसांचे कौतुक देखील न्यायालयाने केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या डॉक्टर, सायबर एक्सपर्ट, फॉरेन्सिक तज्ज्ञ यांचे सुद्धा कौतुक केले आणि एक प्रकारे या आरोपीला फासावर लटकवण्यामध्ये हे सर्व पुरावे निर्णायक ठरल्याचे स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “या आरोपीने 53 वर्षांचा असतानाही एका कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार प्रयत्न केला होता, तेव्हा सुद्धा ती मुलगी अल्पवयीन होती. एका म्हातारीवर देखील त्याने हल्ला केला, तसेच आणखी एका महिलेवर त्याने अत्याचार केला आहे. त्यामुळे या आरोपीला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही, त्यामुळे त्याने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे,” असे न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावताना सांगितले आहे. अवघ्या 16 दिवसांमध्ये या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कोर्टामध्ये या प्रकरणाला पूर्ण वेळ देण्यात आला होता. त्यामुळे खटला 16 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणामध्ये 55 साक्षीदार तपासण्यात आले.







