बँक ऑफ बडोदाचा वीजपुरवठा खंडित; दिवसभर आर्थिक व्यवहार ठप्प
| उरण | प्रतिनिधी |
स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत राज्यभरात चर्चा सुरू असतानाच उरणमधील राष्ट्रीयीकृत बँक ऑफ बडोदा शाखेला त्याचा फटका बसल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला. वीजपुरवठा खंडित झाल्याने बँकेचे दिवसभर सर्व व्यवहार ठप्प राहिले आणि शेकडो ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बँक सुरू झाल्याने सकाळपासूनच ग्राहकांनी व्यवहारासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र, बँकेत वीज नसल्याने संगणकीय प्रणाली पूर्णपणे बंद पडली. रोकड व्यवहार, धनादेश, पासबुक अपडेट, पैसे जमा-उचल आणि इतर सर्व सेवा ठप्प झाल्याने ग्राहकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. याबाबत बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, तपासणीदरम्यान बँकेला अदानीचा स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, मीटर बसविण्याबाबत बँकेला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला. तसेच, एक वीजबिल थकीत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचेही समोर आले.
ही बाब लक्षात येताच बँक व्यवस्थापकांनी तातडीने पिरकोन येथील शाखेत जाऊन थकीत वीजबिल भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी धावपळ केली.
दरम्यान, स्मार्ट मीटरमुळे थेट राष्ट्रीयीकृत बँकेचेच व्यवहार ठप्प झाल्याने या व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अत्यावश्यक सेवांनाही अशा प्रकारे फटका बसत असेल, तर सामान्य ग्राहकांचे काय, असा सवाल उपस्थित होत असून, दिवसभर मनस्ताप सहन करावा लागलेल्या ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.







