| खरोशी | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील रामवाडी येथील धोकादायक पाणी प्रवाहाबाबत दुर्घटना घडण्यापूर्वी तात्काळ उपयोजना करावी, अशी मागणी निवृत्त इंजिनिअर जीवन पाटील यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे वरून मोठ्या प्रमाणात पाणी थेट राष्ट्रीय महामार्गावर कोसळल्याने या महामार्गाला धबधब्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहने, शालेय बस तसेच इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेला गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जर दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल ही जीवन पाटील यांनी केला आहे.
याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अभियंता जीवन पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पचे वरिष्ठ अधिकारी निखिल कुमार यांच्याशी दूरध्वनीवर सविस्तर चर्चा केली. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची माहिती, छायाचित्रांसह आवश्यक तपशील नमूद करून त्यांना अधिकृत ई-मेलद्वारेही पाठविण्यात आला आहे. दि.30 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी थेट राष्ट्रीय महामार्गावर कोसळल्याने दुचाकीस्वार, चारचाकी वाहने, शालेय बस तसेच इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला होता. या धोकादायक परिस्थितीची छायाचित्रे व माहिती प्रशासनालाही देण्यात आली. याबाबत प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी निखिल कुमार यांनी संबंधित ठिकाणी कायमस्वरूपी पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्यासाठीचा प्रस्ताव दिल्ली येथील सक्षम कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन सकारात्मक असून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.







