महिला वेटरसह नऊ जणांवर गुन्हा दाखल
। पनवेल । प्रतिनिधी ।
खांदेश्वर पोलिसांनी इंटरनेट बार अँड रेस्टॉरंटवर छापा मारून अश्लील वर्तन तसेच परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या महिला वेटर, मॅनेजर आणि कर्मचारी अशा एकूण नऊ जणांवर कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे.
नवी मुंबई शहरातील लेडीज बार चालक विहीत वेळेनंतर बार सुरु ठेवून परवान्यांच्या अटींचे उल्लंघन करत असल्याचे तसेच बारमधील महिला वेटरकडून गैरकृत्य करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी परवान्यांच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्या लेडीज बारची झाडाझडती सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून खांदेश्वर पोलिसांच्या पथकाने रात्री इंटरनेट बार अँड रेस्टॉरंटवर छापा टाकला. यावेळी या बारमध्ये काही महिला अश्लील हावभाव करत असल्याचे आढळून आले. तसेच बारचा व्यवस्थापक आणि वेटर महिला वेटर्सना अशा अश्लील कृत्यांसाठी प्रोत्साहन देत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या बारमधील महिला वेटर व पुरुष वेटर आणि मॅनेजर अशा एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.






