पाच वाहनांचे मोठे नुकसान; रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
| नेरळ| प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पळसदरी आदिवासी वाडीमध्ये दरड कोसळली. यावेळी तीन वाहनांवर मातीचा मलबा आल्याने गाड्यांचे नुकसान झाले आहे. स्थानिक आमदार यांच्याकडून पाहणी करण्यात आली असून प्रांत अधिकारी तसेच गटविकास अधिकारी घटनास्थळी पोहचले होते.
कर्जत तालुक्यातील पळसदरी-ठाकूरवाडी येथे आज (दि.6) पहाटेच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन चारचाकी आणि तीन दुचाकी वाहने ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने आणि वाहनांमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. डोंगरावरील वस्तीला जाणाऱ्या दुर्गम रस्त्यावर वाहने नेणे शक्य नसल्याने, स्थानिक नागरिकांनी आपली वाहने रस्त्यालगत असलेल्या एका शेडमध्ये उभी केली होती. पहाटेच्या वेळी डोंगराचा मोठा भाग खचून प्रचंड प्रमाणात माती आणि दगड-धोंडे या शेडवर व रस्त्यावर आले. या ढिगाऱ्यामुळे वस्तीकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला असून, काही ठिकाणी रस्त्याचा भागही खचला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, मंडळ अधिकारी वैशाली पाटील, तलाठी शितल मंदाडे, ग्रामसेवक अनिल राठोड, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक शरद रोकडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोचून तातडीने जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील दरडीचा मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
स्थानिकांचे स्थलांतरण
पावसाच जोर कायम असल्याने डोंगरावरून आणखी दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ठाकूरवाडीतील रहिवाशांना तातडीने 'पळसदरी मठामध्ये' सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे.







