एसआयआरसाठी शाळांच्या वेळेत बदल; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी
| रायगड | प्रतिनिधी |
राज्यात मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्त शिक्षकांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी आता शाळांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार 30 जुलैपर्यंत राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. मात्र, या आदेशामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत शिक्षक संघटनांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना बीएलओ शिक्षकांबाबत पत्र दिले होते. त्यात ज्या शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, त्यांच्या शिकवणीच्या तासिका शक्यतो कमीत कमी, सलग ठेवाव्यात, बीएलओ म्हणून नियुक्ती नसलेल्या शिक्षकांनी बीएलओ म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या कामात सहाय्य करावे, जेणेकरून शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणार नाही, असे नमूद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, बीएलओ असलेल्या शिक्षकांना मतदारयाद्यांचे काम करण्यास वेळ मिळण्यासाठी थेट राज्यातील शाळांचीच वेळ बदलण्यात येणार आहे.
डॉ. पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, महापालिकांचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना दिलेल्या सूचना दिव्या आहेत. त्यानुसार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्य शासकीय, स्थानिक प्राधिकारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांनाही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या दोषविरहीत, अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण सुमारे 24 वर्षांनंतर राबवण्यात येत आहे. हे काम राष्ट्रीय कर्तव्य असून भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत पार पाडण्यासाठी बीएलओ यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.
त्यामुळे शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कामकाज पार पाडण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळावा, काम दिलेल्या कालावधीत पूर्ण व्हावे, कामाचा ताणही येवू नये, यासाठी सर्व शाळा प्रशासनांना आपल्या स्तरावरुन सूचना द्याव्यात. बीएलओ शिक्षकांच्या अध्यापनाचे नियोजन करताना त्यांच्या शिकवणीच्या तासिका शक्यतो कमीत कमी ठेवाव्यात, व त्या प्राधान्याने सलग ठेवून शक्यतो शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरवण्याचे नियोजन 30 जुलैपर्यंत करावे, संबंधित शिक्षकांना त्यांचे शैक्षणिक कार्य सलग पूर्ण करुन उर्वरित वेळेत बीएलओ म्हणून असलेली जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडता येईल, बीएलओ नसलेल्या शिक्षकांनी आवश्यकतेनुसार बीएलओ असलेल्या शिक्षकांना शैक्षणिक, संबंधित कामकाजामध्ये सहकार्य करावे, तसेच बीएलओ शिक्षकांवर काम पडणार नाही अशा प्रकारे शाळा प्रमुखांनी अंतर्गत कामाचे नियोजन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सर्व सूचना तातडीने अंमलात आणून शाळांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अनुपालन अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करण्याबाबतही नमूद करण्यात आले आहे.







