जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले निवेदन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि रुग्णांच्या गैरसोयींची दखल घेत बुधवारी (दि. 8) नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर प्रशासनाला निवेदन देत धारेवर धरले.
पाहणी दरम्यान रुग्णालयाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे, अनेक ठिकाणी धोकादायक अवस्था निर्माण झाल्याचे तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर आले. काही कर्मचारी आणि परिचारिकांकडून नागरिकांशी उद्धट भाषेत वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारीही नगराध्यक्षांच्या निदर्शनास आल्या. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, सरकारी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशी भूमिका मांडली.

जिल्हा रुग्णालयाची इमारत धोकादायक, महत्त्वाचे विभाग स्थलांतराच्या उंबरठ्यावर आणि रायगडच्या पहिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह! अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाच्या निर्णयाची वाट न पाहता अलिबागच्या तरुण नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी थेट मैदानात उतरून लढाईची भूमिका घेतली आहे.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देत त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “अलिबागचे जिल्हा रुग्णालय आणि त्याची ओळख हिरावून घेणारा कोणताही निर्णय रायगडकर सहन करणार नाहीत.”
यासंदर्भात नगराध्यक्षा अक्षया नाईकयांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोन्ही प्रमुख प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून अलिबाग जिल्हा रुग्णालयातील महत्त्वाचे विभाग जिल्ह्याबाहेर स्थलांतरित न करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सकारात्मक निर्णय न घेतल्यास नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभाग तसेच पी.एम.सी. आणि के.एम.सी. वॉर्ड असलेली इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आणले आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे विभाग तात्पुरते सुरक्षित इमारतीत हलविण्याची आवश्यकता असल्यास त्याला कोणताही विरोध नाही. मात्र या विभागांचे पेण अथवा पनवेल येथे स्थलांतर करण्याचा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असून अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा तसेच किनारपट्टी आणि ग्रामीण भागातील हजारो नागरिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयावर अवलंबून आहेत. महत्त्वाचे विभाग पेण किंवा पनवेल येथे हलविल्यास गरीब, ज्येष्ठ नागरिक, महिला, अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांना अतिरिक्त प्रवास, आर्थिक भार आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.







