| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पनवेल शहरातील अनेक भाग जलमय झाले. भाजी मार्केट परिसरातील सरोवराचे पाणीही रस्त्यावर वाहू लागल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या परिस्थितीला नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेकण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा कारणीभूत असल्याचे स्वच्छता मोहिमेदरम्यान स्पष्ट झाले. पाणी पिऊन झाल्यानंतर अनेक नागरिक प्लास्टिकच्या बाटल्या थेट नाल्यांमध्ये फेकत असल्याने पाण्याचा प्रवाह अडथळला जात आहे. पनवेल महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाळा सर्कल परिसरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करण्यात आली. यावेळी नाल्यातून हजारो प्लास्टिकच्या बाटल्या आणि मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढण्यात आला. पालिकेकडून सातत्याने स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविली जात असली तरी काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे शहरासमोर गंभीर समस्या निर्माण होत आहेत. नाले तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचते आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.






