| पनवेल | प्रतिनिधी |
गेल्या दोन दिवसांपूर्वी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या कळंबोलीतील मयूरेश पाटीलचा मृतदेह शिरवली स्मशानभूमीच्या जवळील नदीत सापडला. त्याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
7 जुलै रोजी मयूरेश पाटील यांच्यासह पाच ते सहा मित्र पनवेल तालुक्यातील मोरबे ते बदलापूर बोगदा जवळील भेकरेवाडी, शिरवली गाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. ते पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता मयूरेश पाटील याचा पाय घसरला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पनवेल तालुका पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सलग तीन दिवस त्याचा पाण्याच्या प्रवाहात अग्निशामक दल, एनडीआरएफची टीम, पनवेल तालुका पोलीस ठाणे ग्रामस्थ व मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडून येत नव्हता. अखेर राबवलेल्या शोध मोहिमेत शिरवली गाव स्मशानभूमी जवळील नदीत त्याचा मृतदेह सापडून आला. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदी, ओढे, तलाव परिसरात नागरिकांनी पाण्यात उतरू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.







