प्रशासनाची तातडीने पाहणी; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील रायगड-रत्नागिरी सीमावर्ती ओंबळी गावातील हनुमानवाडी-दत्तवाडी परिसरात डोंगर उतारावरील जमिनीला मोठ्या भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओढ्यालगतच्या उतारावर सुमारे 50 ते 70 मीटर लांबीच्या, एक ते दोन फूट रुंदीच्या आणि दीड ते तीन फूट खोल भेगा पडल्या आहेत. सरपंच रूपाली चिकणे यांनी याची माहिती तत्काळ पंचायत समितीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली.
यानंतर पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी चिमाजी हंबीर आणि बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी सरपंच रूपाली चिकणे, दिलीप चिकणे, अतिश चिकणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना भेगा पडलेल्या परिसराची माहिती दिली. पाहणीनंतर प्रशासनाने परिसरातील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.







