। पनवेल । प्रतिनिधी ।
उलवे, सेक्टर-23 मधील उच्चभू इमारतीमधील फ्लॅटस् मध्ये शासनाचे नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीररित्या व्यावसायिक लॉजिंग चालविण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. अभिभा स्टे या नावाने बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या या लॉजिंगवर उलवे पोलिसांनी छापा मारुन ते बंद केले आहे. तसेच 3 भागीदार व्यावसायिकांविरुध्द गुन्हा दाखल केला.
उलवे पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या सुमारास आपल्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी सेक्टर-23 मधील ब्रम्हराज एन्क्लेव्ह या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 601,602,603 आणि 604 मध्ये विनापरवाना व्यावसायिक स्तरावर लॉजिंग चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी सदर 4 फ्लॅटमध्ये कोणतीही वैध परवानगी किंवा परवाना नसताना निवासी संकुलात लॉजिंग सुरु असल्याचे आढळून आले.
आरोपींनी कोणत्याही शासकीय प्राधिकरणाची किंवा पोलिसांची परवानगी न घेता निवासी फ्लॅटसचे व्यावसायिक लॉजिंगमध्ये रुपांतर केल्याचे तसेच शासकीय आदेशांचे उल्लंघन करुन ग्राहकांना बेकायदेशीररित्या वास्तव्यासाठी खोल्या दिल्या जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली असता, त्यांच्याकडे व्यवसायाचा कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी अजय गर्ग (35), रोनक अग्रवाल (40) आणि पार्थ नजाज (21) तिघा भागीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.







