| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
स्मार्ट सिटी म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या पनवेल शहराच्या प्रवेशद्वारावरच बेघर नागरिकांचे वास्तव पाहायला मिळत असल्याने शहराच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर तसेच एसटी डेपोसमोरील उड्डाणपुलाखाली अनेक बेघर नागरिक दिवस-रात्र झोपलेल्या अवस्थेत दिसून येतात. दररोज हजारो प्रवासी पनवेल रेल्वे स्थानकातून ये-जा करतात. स्थानकाबाहेर पडताच बेघर नागरिकांचे हे चित्र प्रथमदर्शनी पाहायला मिळत असल्याने शहराच्या स्मार्ट सिटीच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
पनवेलपासून काही अंतरावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले असून, मोठ्या प्रमाणात देशांतर्गत प्रवाशांची ये-जा सुरू आहे. याच महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू होण्याची शक्यता असल्याने परदेशी प्रवाशांची संख्याही वाढणार आहे. अशा वेळी पनवेल हे प्रमुख प्रवेशद्वार असल्याने शहराची पहिली छाप अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, पनवेल महानगरपालिका बेघर नागरिकांसाठी विविध ठिकाणी शेल्टर होम उभारण्याचे काम करत असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही केंद्रे नेमकी कधी पूर्ण होणार आणि बेघर नागरिकांना सुरक्षित निवारा कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. एका बाजूला कोट्यवधी रुपयांची विकासकामे, स्मार्ट सिटीचे दावे आणि आधुनिक सुविधा उभारल्या जात असताना दुसऱ्या बाजूला उड्डाणपुलाखाली झोपणारे बेघर नागरिक हे वास्तव प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. शहराची प्रतिमा उंचावायची असेल, तर केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर बेघर नागरिकांच्या पुनर्वसनालाही तितकेच प्राधान्य देणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.







