लखनऊ | वृत्तसंस्था |
लखनऊमध्य चालत्या ट्रकमधून मिराज या लढाऊ विमानाचं टायर चोरी गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता हे टायर सापडल्याचं समजतं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे टायर लखनऊच्या बख्शी का तालाब परिसरातील एअरफोर्स स्टेशनमधून राजस्थानच्या जोधपुर एअर बेसकडे हे टायर घेऊन जात असताना हे टायर चोरी गेले होते. देशभरात या घटनेची चर्चा वार्यासारखी पसरल्याने लखनऊ पोलिसांसमोर हे टायर शोधण्याचं मोठं आवाहन निर्माण झालं होतं.
लखनऊमधील शहीद पथ येथून ट्रेलरमध्ये ठेवलेल्या लढाऊ जेट विमानाच्या पाच चाकांपैकी एक चाक चोरट्यांनी चोरुन नेलं होतं. फायटर जेट विमानाचे चोरीला गेलेले चाक शोधण्यासाठी पोलीस विभाग सध्या अलर्ट मोडवर होता. त्यानंतर आता हे टायर सापडलं असुन, चोरांनी वेगळंच कारण सांगितलं आहे.
लखनऊ पोलीसांनी हे टायर शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. सर्व रस्ते आणि चेकनाक्यांवर चौकशी सुरू केली. त्यातच या घटनेचा तपास करत असताना 4 डिसेंबरला दोन लोक बख्शी का तालाब परिसरातील एअर स्टेशनवर ते टायर घेऊन आले. तेव्हा त्यांना या चोरांनी ट्रकचे टायर समजून हे टायर चोरून नेल्याचे सांगितले. त्यामुळे आता अखेर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला आहे.