| ओडिशा | वृत्तसंस्था |
भारताने नुकतेच पाकिस्तानचे नापाक दहशतवादी हेतू हाणून पाडले आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर करत पाकिस्तानातील दहशतवादी तळं नष्ट केली. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले केले. मात्र, भारतीय सैन्याने हे हल्ले परतवून लावले. या संघर्षादरम्यान अवघ्या जगाने भारताची क्षेपणास्त्र ताकद पाहिली. आता भारताची हीच ताकद आणखी मजबूत करण्यासाठी सैन्याच्या ताफ्यात भार्गवास्त्रची एन्ट्री झाली आहे.
हवाई हल्ल्यांदरम्यान ड्रोनच्या ताफ्यांपासून होणारा धोका रोखण्यासाठी भारताकडे आता एक नवीन आणि कमी खर्चिक उपाय आला आहे. भार्गवास्त्र नावाची ही हार्ड किल मोड काउंटर ड्रोन प्राणाली सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड एसडीएएलने डिझाईन आणि विकसित केली आहे. त्याची पहिली चाचणी आज यशस्वीरित्या पार पडली आहे. ओडिशाच्या गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये त्याची चाचणी घेण्यात आली. भार्गवास्त्र ही प्रणाली सूक्ष्म रॉकेटद्वारे ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. विशेषतः ड्रोनच्या धोक्यांना रोखण्यासाठी ही प्रणाली विकसित केली गेली आहे.
भार्गवास्त्र प्रणालीच्या मायक्रो रॉकेट्सची चाचणी 13 मे 2025 रोजी ओडिशातील गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये करण्यात आली. यावेळी भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. याच्या एकूण तीन चाचण्या घेण्यात आल्या. दोन चाचण्यांमध्ये, प्रत्येकी एक रॉकेट सोडण्यात आले, तर एका चाचणीत फक्त दोन सेकंदांच्या फरकाने सॅल्व्हो मोडमध्ये दोन रॉकेट सोडण्यात आले. चारही रॉकेट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत, सर्व चाचणी मापदंड पूर्ण केले.
भार्गवस्त्राची खासियत
भार्गवास्त्र हे मानवरहित हवाई वाहन धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. यात द्वि-स्तरीय मारक यंत्रणा आहे. याच्या पहिल्या थरात दिशाहीन मायक्रो रॉकेट्स तैनात केले आहेत, जे 20 मीटरच्या अंतरातील ड्रोनच्या ताफ्याला उद्ध्वस्त करण्यात सक्षम आहे. याचा मारक पल्ला 2.5 किमीपर्यंत आहे. तर, दुसर्या थरामध्ये अचूक लक्ष्य साधणारं मार्गदर्शित सूक्ष्म क्षेपणास्त्र आहे. एसडीएएलने विकसित केलेली ही प्रणाली मॉड्यूलर आणि भूप्रदेशाशी जुळवून घेणारी असून, 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात देखील कार्य करण्यास सक्षम आहे. यामुळे ती भारतीय सशस्त्र दलांच्या मोहिमांमध्ये मोठी भूमिका बजावू शकते. भार्गवास्त्रचे रडार 6 ते 10 किमी अंतरावरील लो रडार क्रॉस-सेक्शनमध्ये हवाई लक्ष्ये शोधू शकते.