। चिपळूण । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख येथील वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन पूल अखेर इतिहास जमा झाला आहे. गेले चार महिने सुरू असलेले या भागातील दोन्ही जुने पूल तोडण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे.
यामुळे आता वाशिष्ठी नदीचे पाणी वेगाने प्रवाहित होणार आहे. हा पूल मातीच्या बंधार्यावर 80 टक्के बांधलेला होता. त्यामुळे 125 मिलिमीटरच्या पुढे पाऊस पडला की या पुलास पाणी अडते आणि ते संपूर्ण खेर्डी-कळंबस्ते आणि चिपळूण शहरात पसरून पूर येत असे. दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात वाशिष्ठी नदीवर नवा पूल बांधण्यात आल्यानंतर जुना पूल महापुरास कारणीभूत ठरत असल्याने तो तोडण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडन सुरू झाली होती.