। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील स्पा सेंटरनंतर रत्नागिरी खेडशी आकाशवाणी केंद्र समोर हॉटेल गौरव लॉज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मंगळवारी (दि. 13) रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांनी कारवाई केली. यावेळी कोकण नगर येथील एकाला अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीत अनैतिक व्यापार चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार त्वरित कारवाई करण्याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकामार्फत लागलीच एक डमी व्यक्ती पाठवून हॉटेल गौरव लॉज येथे छापा टाकण्यात आला.
यावेळी लॉजवर देह विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी 4 महिला आणलेल्या असल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणी अरमान करीम खान (रा. कोकणनगर रत्नागिरी) हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपी अरमान करीम खान (रा. कोकणनगर रत्नागिरी) यास दोन पंचांसमक्ष अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956 कायद्या अंतर्गत ताब्यात घेऊन घटनास्थळावरून तसेच आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल तसेच ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हे पुढील कारवाई करिता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहेत. तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.