दोन दिवसात सुशोभिकरण करण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा हिराजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मारक दालनाची मागील वर्षभरापासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. छताची पडझड होऊनही प्रशासनाकडून याकडे होणारे दुर्लक्ष पाहता, राजकीय नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील यांचा वापर केवळ ‘राजकारणापुरताच’ करायचा आहे का? असा संतप्त सवाल कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी उपस्थित केला आहे.
पुढील दोन दिवसात छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्म्यांच्या दालनाचे सुशोभीकरणाचे काम सुरू झाले नाही, तर आम्ही स्वतः तेथे कामाला सुरुवात करू असा इशारा लेखी पत्राद्वारे दिला आहे. 2018 मध्ये पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर तत्कालीन सभापती अमर मिसाळ यांनी निधी उपलब्ध नसताना स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्म्यांच्या भव्य मूर्ती बसवून हे दालन सुशोभित केले होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून या दालनाच्या छताचा काही भाग कोसळला असून पाण्याची गळती होत आहे. त्यानंतर अनेक सभापती, पंचायत समिती सदस्य आणि गटविकास अधिकारी आले अन् गेले, मात्र एकाने ही या ऐतिहासिक स्मारकाच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली नाहीत. गटविकास अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ‘निधी उपलब्ध नाही’ असे उत्तर दिले जात आहे.
निवडणुकांमध्ये लाखो-करोडो रुपये खर्च करणारे राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी महापुरुषांच्या स्मारकाच्या किरकोळ दुरुस्तीसाठी काही हजारांचा निधी देऊ शकत नाहीत, ही कर्जत तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे. नेरळ येथील व्यापारी संकुलाला हुतात्म्यांचे नाव देण्याचा ठराव एकीकडे घेतला जात असताना, दुसरीकडे थेट पंचायत समितीच्या दालनातील स्मारकाची होणारी ही विटंबना प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या दुरावस्थेबाबत मिसाळ यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. छत्रपतींच्या आणि हुतात्म्यांच्या कृपेनेच आपण समाजात वावरत आहोत. दरम्यान गटविकास अधिकारी सुशांत पाटील या प्रकाराची दखल घेऊन दालनाची तात्काळ दुरुस्ती करणार की दुर्लक्षच कायम ठेवणार? याकडे संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पंचायत समितीच्या संकीर्ण लेखाशीर्षात दुरुस्तीसाठी 10 ते 20 हजार रुपयांचा निधी नक्कीच शिल्लक असतो. जर पंचायत समिती व विद्यमान लोकप्रतिनिधींना हे काम करणे शक्य नसेल, तर आम्हाला परवानगी द्यावी. आम्ही पुन्हा स्वखर्चाने या दालनाची दुरुस्ती करून हुतात्म्यांचा मान राखू.
अमर मिसाळ
कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती







