| मुंबई | प्रतिनिधी |
बीसीसीआयने काही नियमांबाबत मोठे निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. हे नियम नव्या 2026-27 हंगामापासून लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने राज्य संघटनांना या सुधारणांचे वितरण केले असून, क्रिकेटचे नियम निश्चित करणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबने प्रस्तावित केलेले हे बदल आहेत.
बीसीसीआय लागू करणार असलेल्या नियमांनुसार एखाद्या गोलंदाजाने मुद्दाम फ्रंट फुट नो-बॉल टाकला किंवा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर किंवा लँड न होणारा चेंडू टाकला, तर त्या गोलंदाजाला उरलेल्या संपूर्ण सामन्यासाठी निलंबित केले जाणार आहे. इतकेच नाही, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिवसाच्या शेवटच्या षटकात जर गडी बाद झाला, तर खेळ तिथेच थांबवला जात होता. मात्र आता, ते षटक पूर्ण केल्यानंतरच खेळ थांबवला जाऊ शकतो. तसेच, यापूर्वी जर एखाद्या सामन्याचा निकाल लागणार नाही, असे लक्षात आले तर शेवटच्या डावातील खेळ तिथेच थांबवण्याचा निर्णय संघ घ्यायचे. परंतु, या नियमाचा गैरवापर करून कृत्रिम निकाल लावले जात असल्याची चिंता होती. त्यामुळे हा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यात ड्रिंक्स ब्रेकदरम्यान मुख्य प्रशिक्षकांना खेळपट्टीवर जाण्याची परवानगी असेल. तसेच, यष्टीरक्षकाला आता चेंडू गोलंदाजाच्या हातून सुटतेवेळी फक्त हात स्टंप्सच्या मागे ठेवणे आवश्यक असणार आहे. हे नवे बदललेले नियम आगामी दुलीप चषकापासून लागू होणार आहेत. त्यासाठी राज्य संघटनांनी पंच आणि सामनाधिकाऱ्यांना नियमांची माहिती देणे सुरू केले आहे.







