नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, मॉस्कोतील युवकांनी अनुभवली मूर्तीकला
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणपती बाप्पाच्या मूर्तीला आकार देणाऱ्या कुशल हातांची कला, मातीपासून साकारले जाणारे देखणे रूप आणि त्यामागील शेकडो वर्षांची परंपरा… हे सारे अनुभवताना नेदरलँड, जर्मनी, मलेशिया आणि मॉस्को येथील विदेशी युवक अक्षरशः भारावून गेले. अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथील प्रसिद्ध श्री गणेश चित्रशाळेला या विदेशी पाहुण्यांनी शनिवार, दि. 25 जुलै रोजी भेट देत गणेशमूर्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया जवळून अनुभवली. गणेशोत्सव, भारतीय संस्कृती आणि कोकणातील मूर्तिकलेचा हा अनोखा वारसा पाहून त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत भारतीय संस्कृतीप्रती आदर व्यक्त केला.
लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमांतर्गत विविध देशांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतभेटीवर आलेले युवक अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. अलिबाग लायन्स क्लबच्या सदस्यांकडे त्यांचा मुक्काम असून, डॉ. रवींद्र म्हात्रे आणि डॉ. रेखा म्हात्रे यांच्या पुढाकारातून या युवकांना वाघ्रण येथील गणेश चित्रशाळेला भेट देण्याची संधी मिळाली.
चित्रशाळेत दाखल होताच तयार होत असलेल्या आकर्षक गणेशमूर्तींनी विदेशी युवकांचे लक्ष वेधून घेतले. मूर्तींच्या बारकाव्यांचे निरीक्षण करत त्यांनी मूर्ती कशा घडवल्या जातात, त्यांना आकार कसा दिला जातो, रंगकाम आणि अलंकारांची रचना कशी केली जाते, याबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.
कार्लेखिंड येथील प्रयास हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी या युवकांना भारतीय संस्कृती, गणेशोत्सवाची परंपरा आणि कोकणातील गणेशभक्तीचे वेगळेपण याबाबत माहिती दिली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक परंपरेचीही जोड असल्याचे त्यांनी सांगितले.
या संवादातून विदेशी युवकांना महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे व्यापक स्वरूप समजून घेता आले. गणेशमूर्ती निर्मितीमागील कलात्मकता, श्रद्धा आणि परंपरेचा संगम त्यांना विशेष भावला.
मुकुटापासून अलंकारांपर्यंत…
मूर्तिकार निर्भय अनंत धोदरे यांनी विदेशी युवकांना गणेशमूर्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. मूर्ती घडविताना पारंपरिक शिल्पकलेचा वापर, मूर्तीतील कलात्मक बारकावे, पर्यावरणपूरक संकल्पना तसेच गणेशमूर्तीच्या विविध रूपांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. गणरायाच्या मुकुटापासून दागिने, अलंकार, आयुधे आणि विविध आभूषणांपर्यंत प्रत्येक गोष्टीमागे असलेला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अर्थही युवकांनी जाणून घेतला. जिवंत भासणाऱ्या गणेशमूर्ती आणि त्या साकारण्यासाठी घेतली जाणारी मेहनत पाहून या युवकांनी आश्चर्य व्यक्त केले.
‘बाप्पा मोरया’चा जयघोष
चित्रशाळेतील भेटीचा समारोप करताना विदेशी युवकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला. भारतीय संस्कृती, कोकणातील गणेशभक्ती आणि पारंपरिक मूर्तिकलेचा जवळून अनुभव घेता आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या भेटीमुळे रायगडच्या गणेशमूर्ती कलेची ओळख थेट परदेशी पाहुण्यांपर्यंत पोहोचली.
गणेशमूर्ती ही केवळ मातीपासून तयार होणारी कलाकृती नाही, तर त्यामागे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि कलाकाराची अनेक दिवसांची साधना असते. परदेशातून आलेल्या युवकांनी इतक्या उत्सुकतेने मूर्ती निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली, हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आपल्या गणेशोत्सवाची आणि पारंपरिक मूर्तिकलेची ओळख जगभर पोहोचत आहे, याचा विशेष आनंद वाटतो.
– मूर्तिकार निर्भय धोदरे







