| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीए टाऊनशिपमधील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा नियम अधिक कडक केले आहेत. यापुढे सुरक्षा पास स्टिकर नसलेल्या कोणत्याही वाहनाला टाऊनशिपमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रहिवाशांवर निवासी वाटप रद्द करण्यासह अन्य दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
जेएनपीए प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, टाऊनशिपमध्ये ज्यांच्या नावावर घर किंवा दुकान आहे तसेच जेएनपीए टाऊनशिपमधील विविध कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचारी यांनाच वाहनांसाठी सुरक्षा पास देण्यात येणार आहे. जेएनपीएच्या आवश्यकतेनुसार काही अन्य पात्र व्यक्तींनाही सुरक्षा पास देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्राथमिक सूचना दि.9 एप्रिल रोजीच देण्यात आल्या होत्या. प्रशासनाने टाऊनशिपमधील घर किंवा दुकानधारकांना थकीत भाडे तातडीने भरून इस्टेट विभागाच्या बी-101/3, सेक्टर-2 येथील कार्यालयातून सुरक्षा पास घेण्याचे आवाहन केले आहे. जेएनपीएमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी टाऊनशिपच्या मुख्य प्रवेशद्वारावर संपर्क साधून सुरक्षा पास प्राप्त करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यापुढे सुरक्षा पास स्टिकर नसलेल्या वाहनांना टाऊनशिपमध्ये प्रवेश मिळणार नाही. कोणत्याही कारणास्तव सुरक्षा पास न मिळालेल्या अधिकृत रहिवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना टाऊनशिपमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना प्रवेशद्वारावरील नोंदवहीत आवश्यक माहिती नोंदवावी लागणार आहे.






