| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
ग्रामीण भागापासून शहरापर्यंत पतसंस्थांचे जाळे खेडोपाडी पसरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गरजू नागरिकांना तातडीचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पतसंस्था करत आहेत. सहकारामध्ये पतसंस्था ही एक अत्यंत महत्त्वाची व्यवस्था असल्याचे मत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दिपक पटवर्धन यांनी केले.
रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघ मर्यादित, अलिबाग, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला. अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गामध्ये जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे सुमारे 110 प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते. शुक्रवारी (दि.31) या वर्गाचा समारोप झाला.
यावेळी ॲड. पटवर्धन म्हणाले की, पतसंस्थांच्या ठेवींना त्यांच्या वर्गवारीनुसार आवश्यक संरक्षण मिळावे, यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. नाममात्र सभासदांना सोनेतारण कर्जवाटप करण्याची तरतूद सहकार कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असली, तरी या तरतुदीत अधिक व्यवहार्य सुधारणा होण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य पतसंस्था फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून कार्य करताना जिल्हा पतसंस्था महासंघांचे सक्रिय सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महासंघाचे सचिव योगेश मगर, पदाधिकारी संचालक गणेश म्हात्रे, अशोक प्रधान, प्रमोद पाटील, ॲड. के. एस. पाटील, ॲड. अच्युत पाटील, चंद्रशेखर जोशी, उषा चांदगावकर उपस्थित होते.
महासंघ, पतसंस्था ठामपणे पाठीशी - ॲड. जे. टी पाटील
जिल्हा पतसंस्था महासंघाचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष पटवर्धन यांनी केले. त्यावेळी रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष ॲड. जे. टी. पाटील यांनी, रायगड जिल्हा पतसंस्था महासंघ आणि जिल्ह्यातील सर्व पतसंस्था आपल्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील, अशी ग्वाही दिली. अध्यक्षीय भाषणात ॲड. जे. टी. पाटील यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत संचालक, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने ज्ञान अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन
प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या दिवशी सी.ए. पेन्सलवार (पुणे) यांनी टीडीएस, आयकर व जीएसटी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर ॲड. महेंद्र खरात यांनी आदर्श उपविधी व संचालक मंडळाची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले.दुसऱ्या दिवशी ॲड. महेंद्र खरात हे कर्जवाटप, कर्जवसुली, कलम 101 अंतर्गत कार्यवाही व नियम 107 या विषयावर मार्गदर्शन करणार असून, प्रा. एस. बी. वटाणे हे नियामक मंडळ व सहकार कायद्यातील महत्त्वाचे बदल या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.







