भाजपवर भास्कर जाधवांचा घणाघात
| चिरनेर | प्रतिनिधी |
खासदार आणि आमदार चोरल्यानंतर आता भाजपने प्रभू श्रीराम मंदिराच्या दान-देणग्यांवरही डल्ला मारला. 1400 कोटींचे सोने-चांदी चोरणाऱ्या भाजपभोवती आता पापाचा फास आवळला आहे. त्यामुळे भाजपचा अंत प्रभू श्रीरामच करतील, असा घणाघाती हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा गटनेते आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी उरण येथे केला.
उरण शिवसेनेच्यावतीने सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप, विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि स्थानिक भाजप आमदार महेश बालदी यांच्यावर जोरदार टीका केली.
देशातील राजकीय वातावरणावर भाष्य करताना जाधव यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाचा संदर्भ देत सरकारवर निशाणा साधला. न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधुर आणि पॅलेटगनचा वापर केल्याचा आरोप करत, यामुळे देशभरात भाजपविरोधात असंतोषाची ठिणगी पडली असून, हा उद्रेक आता वाढत आहे, असा दावा त्यांनी केला.स्थानिक राजकारणावर बोलताना त्यांनी आमदार महेश बालदी यांनाही लक्ष्य केले. उरण नगरपरिषद निवडणुकीचा संदर्भ देत, भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेना व महाविकास आघाडीने मिळवलेल्या यशामुळे भाजपला धक्का बसल्याचा दावा त्यांनी केला.
माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. उरण नगरपरिषद निवडणुकीत 21-0 असा विजय मिळवण्याची गर्जना करण्यात आली होती; मात्र जनतेने महाविकास आघाडीला साथ देत नगराध्यक्षांसह दहा जागा जिंकून ही गर्जना हवेत विरवली, अशी टीका त्यांनी केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी यशासाठी मेहनत, सातत्य आणि परिश्रम आवश्यक असल्याचे सांगितले.
जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप भोईर यांनी विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीमध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनीही भाजपवर टीका करताना, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कैकपटींनी चांगला, असा टोला लगावला.
उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी उरणमधील रखडलेल्या विकासकामांवरून भाजपला धारेवर धरले. सत्ता हातात असूनही गेल्या बारा वर्षांपासून राजीव गांधी सभागृहाचे काम पूर्ण झालेले नाही, तसेच बायपास रस्त्याचे कामही रखडले असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, कार्यक्रमात उरण नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवक व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्या प्रेरणा पाटील, पंचायत समितीचे उपसभापती परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






