| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरात झालेले अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, रस्त्यांची दुरावस्था, सुस्त प्रशासन यामुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत असल्याचा आरोप महाड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विद्यमान उपनगराध्यक्ष संदीप जाधव व नगरसेवकांनी प्रश्नोत्तराचे तासात उपस्थित केल्यानंतर महाड शहराला कोणत्याही परिस्थितीत बकाल होऊ देणार नाही.
सुरूवातीच्या प्रश्नोत्तराचे तासात उपनगराध्यक्ष संदीप जाधव, हेमंत चांदलेकर यांनी लाड समितीच्या शिफारसी नुसार करण्यात आलेली सोनाली महाडीक उर्फ सोनाली सुर्यवंशी यांची बेकायदेशीर नियुक्ती ही प्रशासनाकडून करण्यात आलेली मोठी चूक आहे. कुठल्याही प्रकारची चौकशी न करता ही नियुक्ती करण्यात आली असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असून, संबंधितांना मुळ कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यात जर ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे आढळून आले तर ती नियुक्ती रद्द करून त्यात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे संकेत नगराध्यक्ष कविस्कर यांनी दिले.
यावेळी 31 जुलै रोजी सदरच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात येत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी यांचे पत्र मी स्वतः पाहिले होते, मात्र त्याच रात्री हे पत्र कुणाच्या दबावामुळे त्याच जावक नंबरवर बदलले गेले हे देखील संदीप जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकारी प्रियांका घनवट ह्या घरी जात असताना कोलाडवरून त्यांना परत फिरावे लागले. यावेळी त्यांच्यावर आलेल्या राजकीय दबावामुळे रात्री सोनाली महाडीक उर्फ सुर्यवंशी यांना अगोदरचे पत्र बदलून द्यावे लागले. राजकीय दबावामुळे असे निर्णय होत असल्यानेच प्रशासन अडचणीत आले असल्याचा आरोप संदीप जाधव यांनी यावेळी केला. कामाची मुदत संपलेल्या ठेकेदाराला खोटी मुदतवाढ दिल्याचा ठराव नोंदवून कुठलीही मुदतवाढ न देता बेकायदेशीरपणे तुरटी आणि टिसीएल पावडर खरेदी करण्याची वर्कॲार्डर आरोग्य विभागाने दिल्याची गंभीर बाबही यावेळी संदीप जाधव यांनी निदर्शनास आणून दिली.
महाड गांधारी पूल ते महामार्गापर्यंतचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले असून या कामावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. ठरलेल्या अटी व शर्तीनुसार हे काम केले गेले नाहीत त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत असे नगरसेवक हेमंत चांदलेकर यांनी आणून देत या कामाची चौकशी करून त्याचे बिल अदा करू नये अशी मागणी केली त्यावर जोवर या रस्त्याचे काम दर्जेदार व योग्य रितीने होत नाही तोवर या रस्त्याचा ताबा घेतला जाणार नाही असे नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी स्पष्ट केले.
महाड नगर परिषदेच्या शाळा नं. 5 च्या इमारतीमध्ये रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज व शाळा सुरू असून त्या बाबतचा कोणताही करार, त्याला मुदतवाढ घेण्यात आली नाही असे नगरसेवक ॲड. जाधव यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यामुळे यावर्षी कोणतीही कारवाई न करता पुढील वर्षां या संस्थेला कायदेशीर नोटीस बजावून या शाळा इमारतीतून बाहेर पडा अशी समज द्या, असे आदेश नगराध्यक्ष कविस्कर यांनी दिले.







