| रोहा | प्रतिनिधी |
रोहे शहरातील अष्टमी येथील डॉ. उजमा पठाण यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित सार्वजनिक विद्यापीठ असलेल्या बाल्टिमोर येथील युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमध्ये सार्वजनिक आरोग्य विषयातील पीएच.डी. संशोधनाचा यशस्वी बचाव दि.17 नोव्हेंबर रोजी पूर्ण करून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचा विषय “ओपिऑइड वापर विकार आणि हिपॅटायटिस सी उपचारांचा प्रवास व त्यांचा आरोग्यविषयक परिणाम” असा आहे. या संशोधनामध्ये ओपिऑइड वापर विकार आणि हिपॅटायटिस सी या दोन्ही आरोग्यसमस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यावसायिक आरोग्य विमाधारक व्यक्तींच्या उपचारपद्धती, उपचारांमधील सातत्य आणि त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकणारे हे संशोधन समाजोपयोगी ठरण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे पालक आरिफ व शबीना पठाण यांनी मनस्वी आनंद व अभिमान व्यक्त केला. आपल्या मुलीच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे आणि स्वप्नपूर्तीचे फलित प्रत्यक्ष अनुभवण्याचा हा क्षण आमच्यासाठी अत्यंत आनंददायी व अविस्मरणीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.






