श्रीलंका संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय; दिवसअखेर 16 धावांची आघाडी
| कोलंबो | प्रतिनिधी |
भारत विरुद्ध श्रीलंका संघात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा बुधवारी (दि.26) चौथा दिवस होता. या सामन्यात श्रीलंकेला फॉलोऑननंतरही 16 धावांची आघाडी घेण्यात यश आले आहे; परंतु, असे असले तरी भारतीय संघाने सामन्यावरील पकड मजबूत केली आहे.
या सामन्यात चौथ्या दिवशी श्रीलंकेने पहिल्या डावातील 8 बाद 265 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी सोनल दिनुशा 85 धावांवर नाबाद होता, तर लहिरू कुमारा 8 धावांवर नाबाद होता. परंतु, चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच लहिरू कुमाराला सारांश जैनने बाद केले. मात्र, दिनूशाने त्याचे शतक पूर्ण केले. अखेर त्याला सारांश जैननेच बाद करत श्रीलंकेचा डाव संपवला. दिनूशाने 162 चेंडूत 102 धावांची खेळी केली, या खेळीत त्याने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. श्रीलंका संघ 89.4 षटकात सर्वबाद 290 धावा करू शकले. या डावात सुरियाबंदाराने तिसऱ्या दिवशी 80 धावांची खेळी केली होती.
दरम्यान, श्रीलंका संघ 213 धावांनी पिछाडीवर राहिल्याने त्यांना भारतीय संघाने फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतल्याने श्रीलंका संघ पुन्हा दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी उतरला. परंतु, मोहम्मद सिराजने चौथ्याच षटकात लहिरू उडाराला 3 धावांवर माघारी धाडले. मात्र, कामिल मिशरा आणि पसिंदू सुरियाबंदारा यांनी 58 धावांची भागीदारी करत डाव सावरला. अखेर त्यांचीही जोडी मिशराला रवींद्र जडेजाने पायचीत करत तोडली. मात्र, सुरियाबंदाराला कामिंडू मेंडिसची साथ मिळाली. सुरियाबंदारा आणि कामिंडू मेंडिस यांनी आपापली अर्धशतके पूर्ण करत शतकी भागीदारी करत श्रीलंकेच्या आशा उंचावल्या. मात्र, पुन्हा एकदा प्रसिद्ध कृष्णा मदतीला धावला आणि त्याने मेंडिसला 55 धावांवर झेलबाद केले. त्यामुळे मेंडिस 92 चेंडूत 55 धावा करून परतला. त्यानंतर कर्णधार धनंजय डी सिल्वाने सुरियाबंदाराला साथ दिली. पंरतु, त्यांची भागीदारी रंगेल असे वाटत असतानाच डी सिल्वाला 23 धावांवर मानव सुथारने बाद केले. त्यानंतर लगेचच शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा सुरियाबंदाराही बाद झाला. त्याला मानव सुथारच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक रिषभ पंतने यष्टीचीत केले. सुरियाबंदारा 173 चेंडूत 92 धावांवर बाद झाला. त्यानंतर निरोशन डिकवेल्लाही 6 धावांवर सारांश जैनने पायचीत केले. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला आणि अखेर पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळही थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेने 72.4 षटकात 6 बाद 229 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना या डावात मानव सुथारने 2 बळी घेतले, तर प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, सारांश जैन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. आता पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय संघ श्रीलंकेला लवकरात लवकर बाद करून मिळवलेले लक्ष्य पार करण्याचा प्रयत्न करेल. तर, श्रीलंका संघ शक्य तेवढ्या जास्त धावा करण्याचा प्रयत्न करत सामना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
सोनल दिनुशाचे सलग शतक
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सोनल दिनुशाने फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 85 धावांवर नाबाद असलेल्या दिनुशाने चौथ्या दिवशी आणखी 15 धावा जोडत आपले शानदार शतक पूर्ण केले. दिनुशाने 147 चेंडूंमध्ये हे शतक गाठले. या खेळीदरम्यान त्याने 8 चौकार आणि 3 षटकार लगावले. विशेष म्हणजे, भारता विरुद्धच्या सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याची उल्ल्ेखनीय कामगिरी त्याने केली आहे.त्यामुळे तो श्रीलंकेच्या खेळाडूंच्या एका प्रतिष्ठित गटात सामील झाला आहे. यापूर्वी अरविंद डी सिल्वा, कुमार संगकारा, सनथ जयसूर्या, महेला जयवर्धने, थरंगा परनाविताना आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी ही कामगिरी केली होती.







