शैक्षणिक क्षेत्राचा लौकिक उंचावला; सांस्कृतिक वैभवाचीही प्रभावीपणे ओळख निर्माण
| रसायनी | प्रतिनिधी |
महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक परंपरा राष्ट्रीय मंचावर प्रभावीपणे मांडत वडगाव जि.प. शाळेचे शिक्षक सुभाष राठोड यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचा लौकिक राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 518 व्या पायाभूत प्रशिक्षण अभ्यासक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत राठोड यांनी आपल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले.
नवी दिल्ली येथे दि.4 ते 25 ऑगस्ट या कालावधीत ‘सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र’ हा राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी देशातील 16 राज्यांमधील 115 शिक्षकांनी सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय मंचावर महाराष्ट्राच्या चमूने राज्याची गौरवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा विविध कलांच्या माध्यमातून सादर केली. सोनल चव्हाण यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर व गोदावरी नदीची माहिती देत महाराष्ट्राची लोकधारा असलेली लावणी सादर केली. राजेश अग्रवाल यांनी वासुदेव परंपरेचे महत्त्व सांगत भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जीवनप्रवास उलगडला. विवेक निकस यांनी लोणार सरोवराची निर्मिती तसेच राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची माहिती मांडत कृषिप्रधान महाराष्ट्राची लोकधारा सादर केली. सीमा पुरबुज यांनी नांदेडची ऐतिहासिक ओळख करून देत लावणीचे बहारदार सादरीकरण केले. तर लईक शेख यांनी छत्रपती संभाजीनगरची ऐतिहासिक ओळख आणि वैशिष्ट्ये प्रभावीपणे मांडली. या संपूर्ण सादरीकरणात संभाजी जमदाडे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
मात्र, या प्रशिक्षण कार्यक्रमात रायगडचे शिक्षक सुभाष राठोड यांनी आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत राबविलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. त्यांनी वारली आर्ट वॉल, हँगिंग फार्म आणि रोज रीडिंग गार्डन यांसारख्या अभिनव उपक्रमांची माहिती राष्ट्रीय मंचावर दिली. तसेच, अल्काइल अमाईन्स यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या निधीतून शाळेत झालेल्या उल्लेखनीय विकासकामांची माहितीही त्यांनी सादर केली. शालेय शिक्षणामध्ये स्थानिक कला, पर्यावरण, वाचनसंस्कृती आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा प्रभावी वापर कसा करता येतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण राठोड यांनी मांडले. त्यांच्या या मॉडेल उपक्रमांच्या सादरीकरणामुळे रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल घेण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सुभाष राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षण क्षेत्रातून तसेच विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे रायगडच्या शैक्षणिक प्रयोगांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचीही प्रभावीपणे ओळख निर्माण झाली आहे.






