| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ सारख्या मोठ्या लोकवस्तीच्या ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी निधी खर्च केला नव्हता. त्यामुळे आदिवासी कार्यकर्ते सुनील पारधी यांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला वाढता पाठिंबा लक्षात घेऊन नेरळ ग्रामपंचायतीने आदिवासी वाड्यांसाठी सार्वजनिक वापराची भांडी देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये 13 आदिवासी वाड्या आहेत, त्या आदिवासी वाड्यांना सार्वजनिक वापरासाठी जेवण बनवण्याची भांडी दिली जाणार होती. त्यासाठी आर्थिक वर्षात 36 लाख रुपये खर्च केले जाणार होते. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने सप्टेंबर महिना सुरू झाला तरी भांडी वाटप केले नाही आणि भांडी खरेदी देखील केलेली नाहीत. त्यामुळे 13 वाड्यांना भांडी वाटप करण्यात यावे आणि संबंधित आदिवासी निधी थांबवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी सुनील पारधी यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. ग्रामपंचायत कडून कार्यवाही होत नसल्याने ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील पारधी यांनी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केले होते.
आमची आदिवासी लोकांची मागील सहा महिने फसवणूक सुरू आहे. मात्र, ज्येष्ठ मंडळी यांना शब्द म्हणून उपोषण मागे घेतो. परंतु, रविवारी वाटप सुरू झाले नाही, तर पाच दिवसांचे बाप्पांचे विसर्जन झाल्यांवर पुन्हा याच ठिकाणी उपोषण केले जाईल.
सुनील पारधी
उपोषणकर्ते
आमच्या अडचणी पोर्टल काम करीत नसल्याने वाढल्या होत्या. मात्र, आता पोर्टल व्यवस्थित काम करीत असून रविवारी आम्ही सुट्टी न घेता ग्रामपंचायतीमध्ये भांडी वाटप सुरू करू.
सुजित धनगर..
प्रशासक







