रायगडात 1,05,345 गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा; पुढील दहा दिवस घरोघरी भक्तीचा जागर
| रायगड | प्रमोद जाधव |
विघ्नहर्ता, सुखकर्ता-दुःखहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनाने उद्या संपूर्ण रायगड भक्तीच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. ढोल-ताशांचा गजर, फुलांची आरास, मंगलमय वातावरण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सोमवारी (दि. 14) जिल्ह्यात तब्बल एक लाख पाच हजार 345 गणेशमूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या स्वागताची सुरू असलेली लगबग आज पूर्णत्वास येणार असून, पुढील दहा दिवस रायगडच्या कानाकोपऱ्यात आरती, भजन, कीर्तन आणि भक्तीगीतांचे स्वर घुमणार आहेत. बाजारपेठाही गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. सजावटीचे साहित्य, फुले, पूजेचे साहित्य आणि नैवेद्याच्या खरेदीसाठी रविवारी बाजारपेठांमध्ये भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 18 दिवस उशिरा गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करून घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. काही भक्त रविवारीच बाप्पाला घरी आणणार असून, काहीजण सोमवारी वाजतगाजत गणरायाला घरी घेऊन येणार आहेत.
गणरायाच्या स्वागतासाठी घरांमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक सजावटी केल्या जात आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही सामाजिक संदेश देणारे देखावे आणि उपक्रमांचे नियोजन केले आहे. यंदा नशामुक्ती, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, स्वच्छता यांसारख्या विषयांवरील चलचित्रांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. पारंपरिक भजनांसह जाखडी नृत्य आणि विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांनी गणेशोत्सवाची रंगत वाढणार आहे.
रायगड जिल्ह्यात यंदा एकूण एक लाख पाच हजार 345 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 291, तर घरगुती एक लाख पाच हजार 54 गणेशमूर्तींचा समावेश आहे. यापैकी दीड दिवसांच्या 26 हजार 182, पाच दिवसांच्या एक हजार 338, सहा दिवसांच्या 58 हजार 91 आणि अकरा दिवसांच्या अर्थात अनंत चतुर्दशीच्या 13 हजार 598 गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.
गणेशोत्सव आनंदात आणि शांततेत पार पडावा यासाठी रायगड पोलिसांनीही कंबर कसली आहे. जिल्ह्यात तब्बल दोन हजार 894 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये सात पोलीस उपअधीक्षक, 29 पोलीस निरीक्षक, 128 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, एक हजार 900 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड, बाहेरील 30 पोलीस अधिकारी आणि 300 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. याशिवाय एक एसआरपीएफ दल, चार आरसीपी दल, एक अतिशीघ्र कृती दल आणि 11 स्ट्रायकींग फोर्स तैनात करण्यात येणार आहेत.
बाप्पाच्या आगमनाने रायगडमध्ये पुढील दहा दिवस भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विघ्नहर्त्याचे स्वागत करताना गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचे आवाहन रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी केले आहे.
655 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रायगड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. उत्सवादरम्यान धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या काळात कोणत्याही कारणातून वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 तसेच मुंबई पोलीस अधिनियम आणि मुंबई प्रोव्हिन्सियल मॅजिस्ट्रेट्स ॲक्टअंतर्गत 655 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
291 विसर्जनस्थळे निश्चित
समुद्र 13
खाडी 4
नदी 211
तलाव 54
इतर ठिकाणे 9
एकूण 291
सोशल मीडियावर सायबर सेलची नजर
गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियावरून चुकीच्या किंवा आक्षेपार्ह पोस्ट, अफवा अथवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित होऊ नये, यासाठी रायगड पोलिसांच्या सायबर सेलची विशेष नजर राहणार आहे. सोशल मीडियावर गणेशोत्सवाच्या तयारीचे रिल्स आणि विविध पोस्ट मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असताना त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक पोलीस अधिकारी आणि पाच पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रेल्वे, बसस्थानकांवरही बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. जिल्ह्यात विविध भागांतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढणार असल्याने रेल्वे आणि बस स्थानक परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अलिबाग, महाड, माणगाव, कर्जत, रोहा, पेण, श्रीवर्धन आणि खालापूर येथील रेल्वे व बसस्थानक परिसरात एकूण 84 पोलीस अंमलदार तैनात करण्यात येणार आहेत.







