| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले, रिसॉर्ट्स आणि होम-स्टेचे बांधकाम जोरात सुरू आहे. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही इमारत मालक उर्वरित रेचगा, रॅबिट आणि बांधकाम साहित्य रस्त्यावरून न हटवता तसेच टाकून देत आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस आणि गणेशोत्सवाचा सण असल्यामुळे रस्त्यांवर वाहनांची आणि भाविकांची मोठी वर्दळ आहे. अशा स्थितीत रस्त्याच्या कडेला साचलेला हा राडारोडा दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. पर्यटन आणि निवासी विस्ताराच्या दृष्टीने शहराच्या विविध पाखाड्या आणि आळ्यांमधील मोक्याच्या जागांवर बांधकामे सुरू आहेत. ही बांधकामे करताना लोखंडी शिगा, चिरे, रेती, क्रश सॅन्ड आणि खडी हे साहित्य अनेकदा थेट गटारांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला टाकले जाते. काम पूर्ण झाल्यावर हे साहित्य उचलण्याची जबाबदारी संबंधित मालक अजिबात घेत नाहीत. सततच्या वाहतुकीमुळे हा विखुरलेला रेचगा रस्त्यावर पसरत असून, पावसामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. या बेजबाबदार इमारत मालकांच्या वृत्तीवर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अपघाताची मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी श्रीवर्धन नगरपरिषदेने अशा इमारत मालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.







