| उरण | प्रतिनिधी |
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उरण नगरपरिषदेच्या हद्दीतील गांधीजींच्या पुतळ्याला नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरपालिका कर्मचारीही उपस्थित होते. मात्र, गांधी जयंतीच्या दिवशीच गांधीजींच्या पुतळ्याभोवती वाहनांचे पार्किंग झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महात्मा गांधी यांनी स्वच्छता, शिस्त आणि सार्वजनिक जागेच्या योग्य वापराचा संदेश दिला. मात्र, त्यांच्या जयंतीदिनीच पुतळ्याभोवतीचा परिसर पार्किंग झोन बनल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे गांधीजींच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यापुरतेच प्रशासनाचे कर्तव्य आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
पुतळ्याच्या परिसरात वाहनांचे बेशिस्त पार्किंग होत असताना नगरपालिका प्रशासनाचे याकडे लक्ष का गेले नाही? गांधी जयंतीसारख्या दिवशी तरी पुतळ्याभोवतीचा परिसर स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्याची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. गांधीजींच्या विचारांना अभिवादन करताना त्यांच्या पुतळ्याभोवतीचा परिसरही सन्मानाने जपला जाणे अपेक्षित आहे. मात्र, पुष्पहार अर्पण करून प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी निघून जातात आणि पुतळ्याभोवती पुन्हा वाहनांचा गराडा पडतो, अशी स्थिती असेल तर हा गांधीजींच्या विचारांचा सन्मान की केवळ औपचारिकता, असा सवाल आता उरणकरांकडून उपस्थित होत आहे.






