दोन महिन्यांत लोकार्पणाचा तटकरे यांचा शब्द; पाणी, आरोग्य, रोजगार व पर्यटन सुरक्षेलाही प्राधान्य
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील खैरे खुर्द येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या सुमारे 37 लाख रुपये खर्चाच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाला. गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामाला तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर सुरुवात झाली असून, नाताळच्या सुट्टीपूर्वी इमारतीचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही तटकरे यांनी दिली.
दोन मजल्यांची ही इमारत देखणी आणि दर्जेदार असावी, तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वातावरण मिळावे, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली. स्ट्रक्चरल ऑडिट व तांत्रिक परवानग्यांमुळे काम रखडले होते. आता प्रक्रिया पूर्ण झाल्याने कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तटकरे यांनी म्हसाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. धरणामुळे पाणीपुरवठ्यासोबत परिसराचा विकास व रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. दिवेआगर, हरिहरेश्वर, काशीद व अलिबागसह समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रदूषणमुक्त उद्योग, कौशल्यविकास प्रशिक्षण, शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग व प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मच्छिमारांचा पारंपरिक व्यवसाय टिकवण्यावरही त्यांनी भर दिला. वनविभागाच्या परवानग्या व तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. खैरे खुर्द परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असून, पुढील काही महिन्यांत भूमीपूजनासाठी पुन्हा येण्याचा शब्द तटकरे यांनी दिला. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती मधुकर पाटील, रोहा पंचायत समिती सभापती विजया पाशिलकर, अलिबाग विधानसभा कार्याध्यक्ष मनोजकुमार शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र सकपाळ, संजय माडलुस्कर, हरीचंद्र वाजंत्री, सरपंच मुजम्मील गिते, नितीन डबिर, अतिश मोरे, तेजस्विनी वाजंत्री, संतोष भौड यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.







