प्रवाशांना 25 रुपयांचा अतिरिक्तभुर्दंड
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन-दिघी बसचा मार्ग बदलून ती सर्वे मार्गे वळविण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या मार्गबदलामुळे प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त 25 रुपयांचा भार पडत असून, प्रवासासाठी अधिक वेळही खर्च करावा लागत आहे. त्यातच सकाळी 8:30 वाजताची बस फेरी बंद असल्याने प्रवाशांच्या अडचणींत भर पडली आहे.
श्रीवर्धन बसस्थानकातून पूर्वी सकाळी 8 वाजता सुटणारी श्रीवर्धन-दिघी ग्रामीण फेरीची बस बंद करून वर्षभरापूर्वी सकाळी 7:30 वाजता श्रीवर्धन-दिघी-वडाळा-मुंबई बस सुरू करण्यात आली होती. मात्र, गेल्या महिन्यापासून या बसचा मार्ग बदलून सर्वे मार्गे दिघी असा करण्यात आला आहे. परिणामी, नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला जादा भाडे मोजावे लागत आहे.
या मार्गावरील बससेवेवर मुरुड तालुक्यात जाणारे सरकारी व खासगी कर्मचारी, भाजीविक्रेत्या महिला तसेच दिघी पोर्टवरील कामगार अवलंबून आहेत. सकाळी 6:45 ते 9:30 या वेळेत पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्याने कामावर वेळेत पोहोचताना प्रवाशांची दमछाक होत आहे. प्रवाशांच्या गैरसोयीकडे एसटी प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. प्रशासनाने पूर्वीचा बसमार्ग पुन्हा सुरू करावा आणि सकाळी 8:30 वाजताची बंद फेरी पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.







