| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड पोलिसांच्यावतीने बुधवारी (दि.21)अलिबागमधील मुख्यालयाच्या मैदानात 67वा पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून पोलीस हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. दरम्यान शहीद जवानांना शोक सलामी देण्यात आली. यावेळी शहीद पोलीस जवानांच्या त्यागाचे व कर्तव्यनिष्ठेचे स्मरण करून हुतात्म्यांप्रती उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आदरभाव व्यक्त केला. यावेळी राखीव पोलीस निरीक्षक विजय बाविस्कर, राखीव पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत, अमोल गंगधर, बँड पथक व 175हून अधिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लडाखमधील हॉट स्प्रींग्ज येथे दि.21 ऑक्टोबर 1959 रोजी हरविलेल्या शोध पथकातील कर्मचाऱ्यांचा शोध सुुरु होता. त्यावेळी भारतीय पोलीस पथकावर चिनी सैन्याने गोळीबारसह ग्रेनेडद्वारे हल्ला केला. या सशस्त्र चकमकीत दहा भारतीय पोलीस जवान शहिद झाले. त्यामुळे देशाच्या सीमांचे रक्षण करताना पोलीस जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची, त्यागाची आणि कर्तव्यनिष्ठेची स्मृती कायम राहवी म्हणून 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन साजरा करण्याचा निर्णय जानेवारी 1960 मध्ये पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत घेण्यात आला होता. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस देशाची आंतरिक सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था राखताना प्राणांची आहूती देणाऱ्या शुर पोलीस अधिकारी व जवानांच्या बलिदानाचे स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.







