| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघातील सभासद सुगंधित उटणे तयार करण्याच्या कामाला लागतात. उटणे तयार करणे, त्याची पाकिटे बनविणे आणि त्यांची विक्री करून संघासाठी उत्पन्न मिळविणे, हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, तरी ही परंपरा ज्येष्ठ नागरिकांनी आजही जपली आहे.
दीपावलीच्या अभ्यंगस्नानासाठी सुगंधित उटण्याला विशेष महत्त्व आहे. हीच परंपरा पुढे नेण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद दरवर्षी एकत्र येऊन उटणे तयार करतात. त्याची आकर्षक पाकिटे बनवून विक्री केली जाते. अनेक संस्था आणि नागरिकही दीपावलीसाठी या संघाकडून उटणे खरेदी करतात. त्यामुळे या उपक्रमातून पारंपरिक संस्कृतीचे जतन होण्याबरोबरच संघाला आर्थिक हातभारही लागतो. मात्र, यंदा उटण्याच्या मागणीत घट झाल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांत विविध संस्था आणि राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर उटण्याच्या ऑर्डर मिळत होत्या. त्यामुळे दरवर्षी सुमारे 50 किलो उटणे तयार केले जात होते. यंदा मात्र राजकीय पक्षांकडून अपेक्षित ऑर्डर न मिळाल्याने उत्पादनात घट करावी लागली. यावर्षी केवळ 25 किलो उटणे तयार करण्यात आले आहे.
पनवेलमधील या ज्येष्ठ नागरिक संघाचे शंभरहून अधिक सभासद आहेत. केवळ दीपावलीच्या उपक्रमापुरतेच नव्हे, तर आरोग्यविषयक उपक्रमांमध्येही सभासद एकमेकांना सहकार्य करतात. एकत्र येणे, कामात सहभाग घेणे आणि समाजाशी जोडलेले राहणे, यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते.







