। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील करंजाडे परिसरात पार्क करून ठेवलेली सुमारे चार लाख रुपये किमतीची बीएमडब्ल्यू कंपनीची स्पोर्ट्स मोटारसायकल दोन अनोळखी तरुणांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करंजाडे येथील विशाल नाईक यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदारांनी पार्क करून ठेवलेली बीएमडब्ल्यू जी 310 आरआर मॉडेलची स्पोर्ट्स मोटारसायकल दोन अनोळखी व्यक्तींनी संगनमताने आणि त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा रंग पांढरा असून, तिचा नोंदणी क्रमांक एमएच-46-सीएल-6009 आहे. या मोटारसायकलची अंदाजे किंमत चार लाख रुपये आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत पुढील तपास करीत आहेत. चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.






