गोळीबारात झाल्याने परिसरात खळबळ; दोघेजण गंभीर जखमी
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील तळोजा फेज-2 येथील शिवाजी चौक परिसरात लिफ्ट मेंटेनन्सच्या कंत्राटावरून आणि जुन्या आर्थिक व्यवहारांच्या हिशोबावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान थेट गोळीबारात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन गटांतील वाद विकोपाला गेल्यानंतर लोखंडी रॉड आणि बांबूने मारहाण करण्यात आली, त्यानंतर पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत विशाल शिंदे आणि सचिन डांगे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही गट पूर्वी भागीदारीत लिफ्ट मेंटेनन्सची कामे घेत होते. मात्र, आर्थिक मतभेदांमुळे त्यांच्यात फूट पडली. त्यानंतर नवीन कंत्राट मिळविणे आणि जुन्या देणी-घेणीचा हिशोब यावरून पुन्हा वाद उफाळून आला. या वादातून मारहाण आणि गोळीबाराचा गंभीर प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी सागर डांगे, आकाश डांगे, गणेश लावरे, अनिकेत नरवाडे आणि रुद्र बारवकर यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. तसेच, फरार आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
लिफ्ट मेंटेनन्सच्या कंत्राटावरून झालेल्या वादात थेट गोळीबारापर्यंत मजल जात असेल, तर आर्थिक वर्चस्वाच्या संघर्षातून निर्माण होणाऱ्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शहराचा विस्तार, बांधकाम व्यवसायातील वाढते व्यवहार आणि कंत्राटांसाठी निर्माण होणारी स्पर्धा यांसोबत कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला पाहिजे; सामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण होता कामा नये. तळोज्यातील घटनेचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे, बेकायदा शस्त्रांचा स्रोत शोधणे आणि संभाव्य गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्यास पनवेल तालुक्यातील शांतता आणि सुरक्षिततेपुढील आव्हाने अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
तळोज्यातील गोळीबाराच्या घटनेने पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली आणि खारघर परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकाम व्यवसाय, कंत्राटे, माथाडी व्यवहार आणि अन्य आर्थिक हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाण आणि अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवणे ही पोलिसांसमोरील महत्त्वाची जबाबदारी आहे. अशा व्यक्तींचा गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहे का, बेकायदा शस्त्रे बाळगली जात आहेत का आणि आर्थिक वादांतून हिंसाचार घडविण्याची तयारी सुरू आहे का, याची सखोल पडताळणी होणे आवश्यक आहे.







