| पनवेल | प्रतिनिधी |
कथित मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून पनवेलमध्ये काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि.27) ऑक्टोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील चौकात ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ आंदोलन करण्यात आले. ‘वोट चोर, गद्दी छोड़’ आणि ‘ज्ञानेश कुमार हटाओ, देश बचाओ’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. लोकशाहीचे रक्षण आणि मतदानाच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आवाज उठवला.
पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमित दवे यांनी केंद्र सरकारच्या घोषणांवर टीका करत जनतेच्या मूलभूत प्रश्नांसोबतच लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी कथित मतचोरीचा मुद्दा जनतेसमोर मांडल्याने देशभरात या विषयावर चर्चा आणि जनजागृती होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, ज्येष्ठ नेते, महिला पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी यशवंत सावळेकर, शशिकांत बांदोडकर, सुदाम पाटील, निर्मला मात्रे, हेमराज म्हात्रे, आदित्य सावळेकर, सुधीर मोरे, शाहिद मुल्ला, विकास भारतीय, राजाभाऊ दवे, सागर पगारे, अमित जगनाडे, आरती ठाकूर, नीता शेनॉय, अलका ठाकूर, चैताली ठाकूर आणि सुनंदा घरत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.






