| माथेरान | प्रतिनिधी |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि माथेरान नगरपरिषदकडूनच माथेरानकारांच्या पाण्यावर डल्ला मारला जात असून, येथील अलेक्झांडर हॉटेलमध्ये विना परवाना पाण्याच्या जोडण्या सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांच्याकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईचे सावट असताना माथेरानमध्येही पाण्याचा प्रश्न गंभीर असताना, वॉटर सप्लायच्या फिल्टर हाउस येथून थेट अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अलेक्झांडर हॉटेलला दोन इंची पाण्याची लाईन देण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन हे काम बंद करण्यात आले आहे. याच हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकामाच्या कारवाई वेळी नाममात्र कारवाईचा दिखावा करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. अशाप्रकारे अनधिकृत पणे कामे करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणारी मंडळी गावासाठी घातक ठरत आहेत. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य की हॉटेलच्या सोयीला? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच हॉटेल मध्ये 1 इंचच्या तीन पाणी कनेक्शन असताना आणि सध्याच्या एल निनो आणि दुष्काळ सदृश परिस्थिती, पाणी टंचाई असताना 2 इंच चे नवीन कनेक्शन सध्याच्या परिस्थितीत मंजूर करणे कितपत योग्य आहे? माथेरानचा पर्यटन हंगाम सुरळीत चालण्यासाठी सर्व हॉटेल्स सोबत सामान्य नागरिक, लॉजधारक, स्टॉलधारकांना देखील पुरेसे पाणी मिळणे आवश्यक आहे, नगरपरिषद प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाने याचे स्पष्ट उत्तर द्यावे असे बोलले जात आहे.







