10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
| पनवेल | प्रतिनिधी |
घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचा कथित प्रकार पनवेल तालुक्यातील गिरवले येथे उघडकीस आला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने धाड टाकून 136 गॅस सिलिंडर, गॅस भरण्याची उपकरणे आणि वाहनांसह सुमारे 10 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय परवानगीशिवाय गॅस सिलिंडरचा साठा करून, विद्युत जोडणी असलेल्या उच्चदाब पंपाच्या साहाय्याने घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणण्यात आला. कारवाईत 136 भरलेले व रिकामे सिलिंडर, दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, दोन साधे वजनकाटे, गॅस भरण्याचे उपकरण, विविध कंपन्यांचे सुमारे 150 स्टिकर्स आणि अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला. या प्रकारामुळे गॅसची अनधिकृत साठवणूक आणि पुनर्भरणाच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा पद्धतीने गॅस हाताळल्यास सुरक्षिततेचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत मेटे यांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.






