शेकाप तालुका शेतकरी सभेची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात भात उत्पादक शेतकऱ्यांना हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील अलिबाग व मुरूड तालुक्यातील शेतकरीदेखील मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अलिबाग, मुरूड व रोहा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसा शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी शेकाप अलिबाग तालुका शेतकरी सभेेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाब तालूका शेतकरी सभा अध्यक्ष अनिल गोमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.28) रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेकाप महिला आघाडी तालुका प्रमुख नागेश्वरी हेमाडे, मोहन धुमाळ, प्रमोद घासे, मुळेच्या सरपंच रोहिणी पाटील, अनंत पाटील, दिलीप गावंड, रवींद्र पाटील, महेश झावरे, रामदास शिंदे, नरेश गोंधळी, शैलेश पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.
यंदा पाऊस उशिरा पडला. त्यानंतर पावसाने लवकरच दडी मारली. त्याचा परिणाम जिल्ह्यातील भात पिकांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात भातपीक लागवड केली जाते. शासनाने यावर्षी दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केले. परंतु, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड व रोहा या तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याबाबत शेकाप अलिबाग तालुका शेतकरी सभेने बुधवारी जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली 5 हजार रुपयांची अग्रीम मदत तातडीने देण्यात यावी. भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे तालुक्यातील प्रत्येक सजाप्रमाणे तातडीने करण्याचे संबंधितांना आदेश देण्यात यावेत. पिण्याच्या पाण्याचे नियोजन प्रत्येक ग्रामपंचायतीप्रमाणे करून आवश्यकतेनुसार, टँकर उपलब्ध करण्यात यावेत, अशा अनेक मागण्या शेकापच्यावतीने करण्यात आल्या.
शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या आदेशानुसार तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी अलिबाग व मुरूड व रोहा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यांतील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई तातडीने देण्याची मागणीही केली आहे.
अनिल गोमा पाटील,
शेकाप अलिबाग तालुका शेतकरी सभा






