| पोलादपूर | प्रतिनिधी |
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्याच्या घरातून अज्ञात चोरट्याने तब्बल 6 लाख 61 हजार 50 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना पोलादपूर तालुक्यातील आड-चांभारगणी बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी शुक्रवारी (दि. 30 ) अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी राकेश चंद्रकांत सोंडकर (38) हे मिरारोड येथे नोकरीला असून गणशोत्सवानिमित्त गावी आले होते. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर अंगावरील सोन्याचे दागिने पिशवीत काढून ठेवले असता अज्ञात चोरट्याने घरातून पिशवी चोरून नेली. यामध्ये दोन सोन्याच्या चेन, गणपती लॉकेट, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याचे ब्रेसलेट असा ऐवज होता. पोलीस हवालदार म्हात्रे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.




